काकासाहेब चव्हाण कॉलेजला राष्ट्रीय स्तरावरील नॅक पिअर टीम भेट देणार


  1.              दि. १३ जाने २०२४ थोर देशभक्त स्वातंत्र्यसेनानी काकासाहेब चव्हाण व शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या त्यागातून, प्रेरणेतून १९६९ साली श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर या शिक्षण संस्थेच्या काकासाहेब चव्हाण कॉलेज, तळमावले या महाविद्यालयाची स्थापना झाली. या ज्ञानवृक्षाने १९६९ सालापासून असंख्य विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या  स्वप्नरुपी पंखांना बळ देण्याचे काम निष्ठापूर्वक केले आहे. राष्ट्रीय पातळीवरील 'नॅक' पीअर टीमकडून (त्रिसदस्यीय समिती)  महाविद्यालयातील विविध विभागांना भेटी देऊन  अध्ययन, अध्यापन, संशोधन, पायाभूत सुविधा आणि एकूणच शैक्षणिक गुणवत्ता इ.बाबींची तपासणी होणार आहे. तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकांचे संशोधन कार्य,  विविध संस्थांबरोबर केलेले सामंजस्य करार, प्राध्यापकांना व महाविद्यालयास मिळालेले विविध पुरस्कार, विविध समाज उपयोगी उपक्रम, विद्यार्थी कल्याण मंडळाचे उपक्रम, महाविद्यालयाचा प्लेसमेंट सेल, ग्रंथालयाची प्रगती, राष्ट्रीय सेवा योजना, क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य, सांस्कृतिक कार्यक्रम, रेन वॉटर हार्वेस्टिंग, महाविद्यालयातील औषध उपयोगी झाडे, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा, विद्यार्थिनींसाठी असलेली वसतीगृहाची सोय, आजी-माजी विद्यार्थी व पालकांबरोबर झालेला सुसंवाद या सर्व बाबींची कमिटी पाहणी, अभ्यास करून महाविद्यालयास ग्रेड प्रदान करणार आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरूण गाडे यांनी दिली.  

            या कॉलेजला माजी प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनींची उज्वल, समृद्ध परंपरा लाभली आहे. असंख्य माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनातील महत्वाचा काळ काकासाहेब चव्हाण कॉलेज, तळमावलेतील गुरुजनांच्या व सवंगड्यांच्या सानिध्यात घालवला. गुरुजनांचे स्थान आपल्या हृदयात ध्रुवताऱ्याप्रमाणे अटळ व अढळ आहे. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्काराचा आदर्श घेऊन अनेक विद्यार्थी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करीत महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवत आहेत याचा आम्हास सार्थ अभिमान वाटतो. यापूर्वी शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित ग्रामीण महाविद्यालयामध्ये गुणवत्तापूर्ण महाविद्यालय म्हणून या महाविद्यालयाला गौरविले आहे. महाविद्यालयाच्या गुणवत्तेचा आलेख चढता आहे.  'नॅक' समितीकडून सन २०१७ मध्ये तृतीय मुल्यांकनात महाविद्यालयास २.६८ गुणांसह B प्लस ग्रेड मिळाली आहे. दि. १६ जाने, व १७ जाने, २०२४ रोजी महाविद्यालय 'नॅक' कमिटीला चौथ्यांदा  सामोरे जात आहे. महाविद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये माजी विद्यार्थ्यांचा सिंहाचा वाटा आहे. नॅक मूल्यांकनासाठी  माजी विद्याथ्र्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. महाविद्यालयाचा  विकास करणे, दर्जा वाढविणे, नावारूपास आणणे ही जबाबदारी माजी विद्यार्थ्यांची आहे. ही जबाबदारी आपण नेटाने पार पाडत आहात ही बाब  सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांना आनंद देणारी आहे.  अलीकडेच माजी विद्यार्थी मंडळाच्या पुढाकारातून आर्थिक योगदानामधून सर्व सोयीसुविधांनी अद्ययावत संगणक कक्ष व नॅक प्रोजेक्ट रूम तयार करण्यात आली आहे. भौतिक सुविधा व शैक्षणिकदृष्टया नॅकची तयारी अंतिम टप्प्यात आहे. सर्वांच्या योगदानामुळे कॉलेजला निश्चितपणे A ग्रेड मानांकन प्राप्त होणार आहे. असा विश्वास प्राचार्य डॉ. अरूण गाडे यांनी व्यक्त केला आहे.  

                या कामी संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली  सर्व गुरुदेव कार्यकर्ते, विद्यार्थी -विद्यार्थिनी  तळमळीने काम करीत आहेत. मंगळवार दि. १६ जाने, २०२४ रोजी दु. 1.०० वा. नॅक पिअर टीमसमवेत माजी विद्यार्थी मिटींग (संवाद) संपन्न होणार आहे. या मिटींगसाठी माजी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित राहणे अत्यंत गरजेचे आहे. तरी कॉलेज स्थापनेपासून ते गतवर्षीच्या सर्व माजी विद्याथ्र्यांना नम्र आवाहन करण्यात येते की, मंगळवार दि.१६ जाने, २०२४ रोजी आपण अगत्याने उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य डाॅ.अरुण गाडे यांनी केले आहे.



Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न