जय हनुमान संस्थेकडून महिलांचा असाही सन्मान

तळमावले /वार्ताहर

मान्याचीवाडी (कुंभारगांव) ता.पाटण येथील जय हनुमान सामाजिक संस्था गेल्या काही वर्षापासून समाजोपयोगी उपक्रम राबवण्यासाठी सर्वांना परिचित आहे. परिसरामध्ये या संस्थेेने आपल्या कार्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

यंदा त्यांनी पाहुण्या आलेल्या महिलांना मोफत औदुंबर दर्शन घडवून आणले आहे. गणेशोत्सवामध्ये 2 दिवस पाहुण्या म्हणून आलेल्या गौराईचा आपण मोठया आनंदाने उत्साहाने मानसन्मान करतो मग आपल्या घरी राबवणाऱ्या गौराईचा सन्मान व्हावा ही सद्भावना मनामध्ये ठेवून जय हनुमान संस्थेकडून खास महिलांसाठी श्री क्षेत्र औदुंबर येथे मोफत यात्रा घडवून आणली आहे. यामध्ये 100 पेक्षा जास्त महिला सहभागी झाल्या होत्या. संस्थेच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

जय हनुमान या संस्थेने गणपतीची मिरवणूक देखील अत्यंत पारंपारिक पध्दतीने काढली होती. या मिरवणूकीला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. आरेवाडी येथील श्रीराम वारकरी शिक्षण संस्थेचे ह.भ.प.रामदास महाराज आणि ह.भ.प.मधुकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली लहान वारकरी यांनी टाळ, मृदूंग आणि नामाच्या गजरात काढलेली मिरवणूक लक्षवेधी ठरली. तसेच महाप्रसादादिवशी परिसरातील शेकडो लोकांनी या अन्नदानाचा लाभ घेतला आहे.

जय हनुमान सामाजिक संस्थेने आतापर्यंत दत्तक योजनेप्रमाणे शैक्षणिक साहित्य, विद्यार्थी गुण गौरव ओळखपत्र वितरण, पाणी टंचाईग्रस्त भागात पाण्याची सुविधा, स्त्री भ्रुण हत्या अभियान, स्त्रियांसाठी शिलाई मशीन प्रशिक्षण, युवकांसाठी मोफत व्यायामशाळा, गावातील लोकांसाठी मोफत वाचनालय व पाणपोई सुविधा, आरोग्य शिबीरे, नुतनवर्षानिमित्त डायरी वाटप, नृत्य स्पर्धांचे आयोजन, रांगोळी वृक्षारोपण, शाळेतील मुलांना मोफत गणवेश वाटप यासारखे नावीण्यपूर्ण उपक्रम राबवून संस्थेने आपल्या कार्यकर्तृत्वाची मुद्रा समाजमनावर उमटवली आहे.

याशिवाय नंदूरबार जिल्हयातील लक्ष्मीकांत बी.पाटील यांना शस्त्रक्रियेसाठी रु.20,000/-  ची मदत, कळवा जि.ठाणे येथील कमल कळंके यांना कॅन्सर उपचारासाठी रु.5,000/- ची आर्थिक मदत, भांडूप मुंबई येथील शंतनु जाधव या शालेय विद्यार्थ्यास शस्त्रक्रियेसाठी रु.5,000/- ची आर्थिक मदत, ठाणे येथील अॅरमॅन्डो फोर्टीस यांना डोळयाच्या शस्त्रक्रियेसाठी रु.5,000/- ची आर्थिक मदत केली आहे. याशिवाय महाराष्ट्रातील नांदेड जिल्हयातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत, सामाजिकतेचे भान ठेवून महापुजेला होणारा अन्नदानाचा खर्च आणि मिरवणूकीचा खर्च कमी करुन शिल्लक राहिलेली रक्कम रु.35,000/- दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिली आहे. तसेच मुंबई भांडूप येथील कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त 100 नागरिकांना मोफत पॅनकार्ड वाटप केले आहे.

त्यांच्या या कार्याची दखल घेवून महाराष्ट्र शासन पुरस्कृत लोकमान्य महोत्सवांतर्गत गणेशोत्सव स्पर्धेत मंडळाला तालुकास्तरीय तृतीय क्रमांक मिळाला आहे. तर विविध संस्थांनी त्यांना पुरस्कार देवून गौरवले आहे.

हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच कार्यकर्ते असलेल्या या संस्थेने परिसरामध्ये आपल्या कर्तृत्वाने नावारुपाला आली आहे. प्रत्येक वर्षी येथील जवळच असलेल्या विहीरीची साफसफाई, स्वच्छता करुन देणे, शासनाच्या विविध योजनातून व्यायामशाळा व अन्य योजनादेखील आणण्यात ही संस्था यशस्वी ठरली आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत मुलांसाठी विविध स्पर्धा, हळदीकुुंकू समारंभ, तज्ञांची व्याख्याने, आरोग्य शिबीरे, गुणवंत विद्यार्थी सत्कार इ. कार्यक्रम नेहमी राबवले जातात. याशिवाय गुलालविरहित व डाॅल्बीविरहित टाळ-मृदुंगाच्या गजरात गणपती बाप्पाची ने-आण मिरवणूक उत्साहात पार पाडली जाते. अशी अनेक वैशिष्ट्ये या मंडळांची सांगता येतील.

यंदा राबवलेल्या महिलांच्या अनोख्या सन्मानाने परिसरात जय हनुमान संस्थेच्या कार्याची चर्चा चांगलीच रंगली असल्याचे दिसून आले.





Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न