शिवरायांना वंदन करुन रोहित साळुंखे ने बांधली लग्नगाठ

तळमावले/वार्ताहर

पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील किसन धोंडिबा साळुंखे यांचे चिरंजीव रोहित आणि शामगांव (ता.कराड) येथील सदाशिव पोळ यांची कन्या ऋतुजा यांचा विवाह सोहळा नुकताच संपन्न झाला. या लग्नसोहळयात मंगलाष्टकापूर्वी रोहित आणि ऋतुजा या नववधु-वरांनी छत्रपती महाराजांच्या पुतळयाचे विधीवत पूजन करत महाराजांच्या नावाचा जयजयकार केला. शिवरायांच्या विचारांचा दरवळ सर्वदूर पोहोचवत दोघांनी लग्नगाठ बांधली. स्टेजवर वधूवरांच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवण्यात आला होता. त्यामुळेे लग्नात उपस्थित असलेल्या प्रत्येकाची छाती अभिमानाने फुलून गेली.
रोहितला दुर्गभ्रमंती करण्याची आवड आहे. अनेक किल्ले त्यांने पादाक्रांत केले आहेत. शिवशंभू ट्रेकर्स च्या माध्यमातून तो शिवजयंती किंवा अन्य कार्यक्रमात हिरीहिरीने सहभागी असतो. विशेष म्हणजे लग्नामध्ये रोहित आणि ऋतुजा या दोघांनी पारंपारिक पोषाख परिधान केले होते. या विवाहानिमित्त नातेवाईक, मित्रमंडळी व मान्यवरांना निमंत्रण देण्यासाठी परंपरेनुसार आकर्षक पत्रिका छापण्यात आल्या होत्या. या पत्रिकेला शिवकालीन लखोटयाचा लुक दिला होता. स्टेज आणि मंडपात देखील शिवकालीन कलाकुसरीने भर घातली होती. याशिवाय सोशल मिडीयासाठी व्हिडीओच्या माध्यमात केलेल्या पत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महराज आणि किल्ल्यांचे फोटो इ.चा समावेश केलेला दिसत होता.
भारतीय संस्कृतीत लग्न म्हटलं की आनंद आणि उत्साहाचेे वातावरण असते. गेल्या काही वर्षांपासून लग्नात धार्मिक परंपरा, संस्कृती, चालीरीती जोपासल्या जात आहेत. काळाप्रमाणे हळुहळु बऱ्याच चालीरीती लुप्तही होत असून लग्नात पाश्चात्य संस्कृती जोपासली जात आहे. मात्र अजूनही ग्रामीण भागातील लग्नसराईमध्ये संस्कृती जपण्याचे काम केले आहे. विवाहाचा सोनेरी क्षण आयुष्यात एकदाच येत असल्याने शाही विवाह सोहळे करण्यावर अनेकांचा भर असतो. त्यातच विवाह म्हटलं की हौसेला मोल नसल्याचे मानले जाते.
रोहितने केलेल्या या आदर्शवत कृतीने लग्नात उपस्थित असलेल्या प्रत्येकाची छाती अभिमानाने फुलली होती. कट्टर शिवभक्त आणि धारकरी असलेल्या रोहितच्या शिवप्रेमाची चर्चा उपस्थितात रंगली होती. साळुंखे आणि पोळ परिवाराच्या या अनोख्या विवाहाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न