माणुसकीचा ‘दीपस्तंभ’ -प्राचार्य डाॅ.यशवंत पाटणे (सर)
आदरणीय प्राचार्य डाॅ.यशवंत पाटणे (सर) आणि माझी प्रथम भेट कधी झाली ते आता नीटसे आठवत नाही. साधारणपणे सन 2006 च्या सुमारास मी सरांच्या वाणी आणि लेखणीच्या प्रेमात पडलो. सरांच्या आणि माझ्या जवळ येण्याचा एक धागा म्हणजे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व.आर.आर.पाटील (आबा). आबांची एकंदरीत वाटचाल मला प्रेरणादायी वाटली म्हणून मी त्यांचे ‘आबा’ या शब्दातून आणि फक्त ठिपक्यातून चित्र रेखाटले होते. ती चित्रे आदरणीय सरांनी आबांना फॅक्स व्दारे मंत्रालयात पाठवली होती. त्यावेळी आबांनी ‘मला या मुलाला भेटायला आवडेल’ असा शब्द दिला. सरांचे आणि माझे नाते जुळले ते यामुळेच.
मला चित्रकला या छंदाबरोबर ‘पत्रमैत्री’चा छंद आहे. मी सरांना अनेक पत्रे पाठवली. त्यावर प्रतिक्रिया देताना सर फोन करायचे त्यावेळी माझी बोलताना कसरत व्हायची. कारण सरांचे शाब्दीक सौंदर्याने, उपमांनी नटलेेले शब्द मला मंत्रमुग्ध करायचे. 28 जुलै, 2006 रोजी सरांनी पाठवलेले पत्र माझ्या ‘पत्रमैत्री’ छंदातील अनमोल ठेवा आहे. सन 2007 रोजीच्या आमच्या ‘शिवसमर्थ’ या दिवाळी अंकातील आदरणीय सरांनी लिहलेली ‘कृतज्ञता’ ही कथा इ.6 वीच्या बालभारतीच्या पाठयपुस्तकात छापली गेली. हा आमच्याही दिवाळी अंकाचा आगळावेगळा सन्मान म्हणावा लागेल. सन 2008 मध्ये मसूर (ता.कराड) येथील जि.प.शाळेमध्ये संत गाडगेबाबा आणि आर.आर.आबा यांची रेखाटलेली रांगोळी आबांनी पाहिल्यानंतर त्याच संध्याकाळी सरांनी आबांना फोन करुन रांगोळी बद्दलचे मत विचारले. त्यानंतर सरांनी मला फोन करुन आबांना रांगोळी खूप आवडल्याचे सांगितले. छोटया छोटया गोष्टीतून आंनद कसा मिळवावा हे त्यावेळी मी सरांच्या कडून शिकलो.
बीए पूर्ण झाल्यानंतर समर्थ मंदिर रोड जवळील आदरणीय सरांच्या कला व वाणिज्य सातारा येथे बीजे (पत्रकारिता) साठी प्रवेश घेतला व मी सरांचा ‘रीतसर’ विद्यार्थी झालो.
डाकेवाडीतून चालत, वडाप, एसटी, रिक्षा असे करत मी साधारण 11 वाजता प्रवेश घेण्यासाठी काॅलेजवर पोहोचलो. प्रवेश घेण्यापूर्वी मी सरांना भेटण्यासाठी त्यांच्या प्राचार्य केबीन मध्ये गेलो. सुरुवातीला काही गप्पा गोष्टी झाल्यावर सरांनी मला विचारले, ‘‘संदीप घरातून किती वाजता निघाला, जेवला का?’’ खरेतर मी सकाळी लवकर निघालो होतो. सर तळमावलेत प्राध्यापक असल्याने त्यांना साताऱ्याला यायला किती वेळ लागेल याचा अंदाज होता. मी सरांना म्हटले, ‘‘हा सर, जेवून आलोय’’. त्यावर सर म्हणाले, ‘‘माझ्याशी खोटं बोलू नकोस’’. सरांनी लगेच बेल वाजवली. आणि आपल्या शिपायाला बोलावून एक ताट, पाण्याचा ग्लास तसेच सरांनी त्यांचा स्वतःचा डबा आणायला सांगितला. सरांनी त्यांच्यासमोर केबीनमध्येच मला जेवायला सांगितले. विद्यार्थ्याच्यांबद्दलचे केवढे हे प्रेम, आत्मियता, आपुलकी? खरंच सरांच्या सान्निध्यात आलेली लोक खूपच नशीबवान आहेत. मला हा प्रसंग अगदी कालच घडल्यासारखा वाटत आहे. हा क्षण मी माझ्या हृदयात जपून ठेवला आहे.
केवळ व्याख्याने देवून, मोठमोठाले तत्वज्ञानाचे लेख लिहून समाजप्रबोधन करता येत नाही. शब्दांच्या बुडबुडयाने मनाचे समाधान होईल पण पोटाचे काय? पोटाची भूक जाणणारा आदरणीय पाटणे सरांच्या सारखा विचारवंत, प्राध्यापक विरळाच आहे असे मला वाटते. यामुळेच आदरणीय पाटणे सर माझ्या ‘काळजाचा’ विषय आहेत.
अजून एक सरांच्या प्रेमळ स्वभावाची आठवण या निमित्ताने सांगितल्यावाचून राहवत नाही. काही कामानिमित्त मी सातारला गेलो होतो. म्हटले आलो आहे सातारला तर सरांना भेटून येवू. सरांना फोन करुन त्यांच्या ‘सुशील’ या निवासस्थानी गेलो. घरामध्ये गप्पागोष्टी, चहापाणी झाल्यावर नेहमीप्रमाणे सरांनी ‘सुंदर जगण्यासाठी’ या अमुल्य ग्रंथांची भेट दिली. ज्ञानाचा खजिना मिळाल्याच्या आनंदात मी सरांचा निरोप घेवून निघालो. साधारणपणे गेटपर्यंत मी चालत गेल्यावर सरांचा पुन्हा फोन आला. ‘‘संदीपजी, जरा पाठीमागे परत या’’. मला तर काही सुचेनाच. मी घराजवळ पोहोचताच सरांनी त्यांच्या अंगणातील पिकलेल्या आब्यांची मोठी पिशवी भरुन मला दिली. या घटनेने मी खूप भारावून गेलो. मोठया माणसांच्या हातून घडलेल्या या छोटया कृती आपल्या जगण्याला खूप मोठे मुल्य आणि मोल देवून जातात. हे या निमित्ताने मला जाणवले.
खरेतर सरांनी माझ्यावर इतके प्रेम करण्या इतपत मी मोठा नसताना शिक्षकांनी विद्यार्थ्यांबरोबर नाते कसे ठेवावे याचा हा एक वस्तुपाठच आहे असे मला वाटते. अर्थात चुकीच्यावेळी सरांनी माझी अनेकदा कानउघडणी देखील केली आहे.
माझ्या ‘पत्रमैत्री’ छंदाच्या वैभवात सरांच्या पत्राचा ऐवज आहे हे मला आवर्जून सांगावे वाटते. सोशल मिडीयामुळे आता या छंदात थोडा मंदावलेपणा आला आहे. परंतू सर ‘व्हाटसअप’ च्या माध्यमातून मला अनेकदा प्रोत्साहनपर, मार्गदर्शनपर शब्दांची उधळण करतात. त्यामुळे जगण्याला नवी प्रेरणा आणि ऊर्मी मिळते. सरांनी त्यांच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका आवर्जून पाठवली आणि तितक्याच आत्मियतेने लग्नाच्या गडबडीत, अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत आस्थेने विचारपूसदेखील केली.
एकदा एका व्याख्यानानिमित्त ते आले असताना त्यांना मी अक्षरगणेशा चित्र भेट दिले. त्यावेळी ते म्हणाले, ‘‘संदीपजी, तुम्ही माझे चित्र रेखाटून दिलेल्या चित्राची फ्रेम आजही माझ्या खोलीत आहे. या खोलीत पुस्तक, वहया पेन या व्यतिरिक्त फक्त ती फ्रेमच आहे’’ याहून मला अजून काय हवे असे मला नेहमी वाटते. आदरणीय सरांच्या बद्दल बरेच काही लिहता येईल. ज्यांच्या जीभेवर साक्षात सरस्वती प्रसन्न आहे, ज्यांच्या लेखणीतून शब्दफुले बाहेर पडतात. अशा व्यक्तीवर माझ्या सारख्याने लिहणे म्हणजे सुर्याच्या प्रखर तेजासमोर एखादा काजवा असण्यासारखेच आहे.
खरंच, मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की सरांच्या सारखे गुरु आमच्यासारख्या मुलांच्या आयुष्याला आकार देण्यासाठी लाभले. ज्यांनी जगण्याला नवी दिशा आणि अर्थ प्राप्त करुन दिला. प्रत्यक्ष आयुष्यातील विनयशील स्वभाव, दुसऱ्याला आदराने बोलणारे, वागवणारे, भाषेवर प्रभुत्व असलेल्या आणि वास्तविक जीवनात तेवढी ममता आणि प्रेम देणाऱ्या सरांना ‘माणुसकीचा दीपस्तंभ’ म्हटले तरी ते वावगे ठरु नये. स्पंदन चॅरीटेबल ट्रस्ट च्या वतीने 2023 मध्ये सराना स्पंदन जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!तसेच त्यांचे आमच्यावरील प्रेम, लोभ कायम राहो हीच इश्वरचरणी प्रार्थना...!
डाॅ.संदीप राजाराम डाकवे
मु.डाकेवाडी, पो.काळगांव, ता.पाटण, जि.सातारा. 415112
मो.9764061633
Comments
Post a Comment