मनमिळावू : शोभा ठाकरे
कोल्हापूरच्या ज्योतिबाला मी फारसा गेलेलो आठवत नाही. परंतू ज्या ज्या वेळी गेलो त्यावेळी शोभा रामचंद्र ठाकरे यांच्या लोभस आणि मनमिळावू स्वभावाचे अंतःकरणापासून दर्शन घडले आहे. एका वर्षी षष्ठीला मला त्यांच्या घरी राहण्याचा योग आला होता. माझा मोठा भाऊ भरत आणि शोभा ठाकरे यांचे पती रामचंद्र ठाकरे यांचे चांगले संबंध होते. नेहमी त्यांचा संवाद व्हायचा. दुदैवाने त्यांचे दोन वर्षापूर्वी त्यांचेही आकस्मिक निधन झाले आहे. ते डाकेवाडीला आले की आवर्जून यायचे. पांढरा सदरा, लेंगा असा त्यांचा पेहराव असायचा. ते दिसले आणि कोणीही त्यांच्या दर्शनाला खाली वाकले की ते जोतिबाच्या चरणाजवळचा असलेला गुलाल त्यांच्या डबीमध्ये असायचा तो ते लावायचे. आज ही परंपरा त्यांची मुले लव आणि तेजस यांनी जपली आहे.
तर सांगायचा मुद्दा हा की, त्यांच्या घरी कितीही भक्तगण आले तरी या घरातील सर्वच व्यक्ती कधीही चिडलेली, रागावलेली किंवा कधीच थकलेली जाणवली नाहीत. काही दिवसांपूर्वी शोभा ठाकरे आणि त्यांचा मुलगा लव हे डाकेवाडीला आल्यानंतर आमच्या घरी आले होते. आम्ही त्यांचा छोटासा मानपानही केला होता.घरी त्यानंतर एकच दिवसाने आम्ही जोतिबाला सहकुटूंब सहपरिवार गेलो होतो. त्यावेळी घरातील सर्वांनी आमचे छान स्वागत केले.
यावेळी शोभा यांचा मुलगा तेजस आणि माझा एवढा परिचय नव्हता. परंतू त्यावेळी तो झाला. दर्शन घेवून आल्यानंतर त्यांच्या शोभा मामी यांनी खास ओल्या नारळाच्या खोबऱ्याने बनवलेली आमटी, पोळया आणि भात वाढला. आम्ही सर्वांनी प्रसादाचा लाभ घेतला. यावेळी त्यांनी आमचा भाऊ घरी प्रसाद घेण्यासाठी आला नाही म्हणून त्यांनी कितीतरी आग्रह केल्याचे आठवते. काही दिवसापूर्वी त्या गेल्या आणि त्यांच्या स्वभावाचे दर्शन झाले. त्यांनी केलेल्या प्रसादाला एक अवीट गोडी असायची. शेकेची चव तर जिभेवर रेंगाळायची. आमच्या कुटूबांचे आणि ठाकरे कुटंबाचे स्नेहबंध जुळत असले तरी शोभा मामींनी केेलेल्या स्वयंपाकाची उणीव जाणवत राहील. त्यांचे अकाली जाणे सर्वांसाठीच धक्कादायक आहे. त्यांच्या पश्चात त्यांची मुले आणि नातवंडे नातेवाईक यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती जोतीबारायाने देवो हीच प्रार्थना
-डाॅ.संदीप डाकवे
स्पंदन परिवार

Comments
Post a Comment