थॅंक्यू...अरुणा
शाळा काॅलेजमध्ये अपघाताने होणारी ओळख पुढील आयुष्यातही कायम राहतेच असे नाही. परंतू माझ्या बाबतीत घडलेली एक घटना मात्र त्याला अपवाद आहे. अर्थात ही ओळख टिकवण्यात त्या समोरच्या व्यक्तीचा मोलाचा वाटा आहे. काॅलेजला असताना मी जीएस च्या निवडणूकीला उभा राहिलो होतो. या निवडणूकीत मतदार असलेल्या सर्व मतदारांकडे मी गेलो होतो. त्यात प्रामुख्याने मुलीच होत्या. या सर्व मुलींशी मी मतदानासाठी बोललो होतो. मात्र त्यातील एकच मुलगी मला ठामपणे मतदान करणार होती तिने तसे सांगितले देखील होते. त्या मुलीचे नाव होते अरुणा मोरे....आताचे शेवाळे...
निवडणूक झाल्यानंतर कधीही या मतदार मुलींचा संपर्क आला नाही. अरुणाने मात्र मला मतदान केले होते. आणि ते लक्षात ठेवले होते. मीही तिला लक्षात ठेवले होते. काळाच्या ओघात प्रत्येकाच्या शिक्षणाच्या आणि जगण्याच्या वाटा बदलल्या. एकेदिवशी मी मुंबईला जात असताना कोल्हापूर नाक्यावर असताना फेसबुक वरील मेसेंजरमधून मला अरुणाचा मेसेज आला. यावेळी एकमेकांचे संपर्क क्रमांक घेतले आणि नंतर नेहमीच संपर्क व्हायचा...
एकेदिवशी ती मुंबईवरुन आल्यानंतर मला भेटण्यासाठी तळमावले येथे आली. त्यावेळी काॅलेजमधील गप्पाटप्पा झाल्या आणि मनमोकळया गप्पा झाल्या. त्यानंतर ती स्पंदनच्या प्रत्येक उपक्रमात सहभागी होवू लागली.
12 सप्टेंबर, 2022 ला माझे वडील अचानक गेले आणि मला धक्कच बसला. या दुःखाच्या वेळी अरुणा येवू शकली नाही याची सल तिच्या मनामध्ये होती. वडिलांच्यावर मी पुस्तक लिहत होतो. वेळोवेळी सोशल मिडीयावर ते व्यक्त करत होतो. यामुळे अरुणा माझ्या आईला भेटण्यासाठी उत्सुक होती.
मोरेवाडयाचा पंचाहत्तरीचा कार्यक्रम होता. यासाठी तिने मला आवर्जून निमंत्रण दिले. यावेळी अरुणाने "तात्या" हे पुस्तक हक्काने मागून घेतले. ते पुस्तक वाचल्यानंतर तिच्या स्वप्नात आई आणि तात्या आल्याचे तिने सांगितले. यामधून तिला माझ्या आईला भेटण्याची ओढ लागली. गावी आल्यानंतर ती वेळ काढून डाकेवाडीला गेली. आईशी खूप मनमोकळया गप्पा मारल्या. आईने तिला घर फिरुन दाखवले. आईसाठी खास पातळ नेले होते. माझ्या पुतणीने हे फोटो मला पाठवले त्यावेळी माझ्या डोळयातून अश्रू आले.
मला काॅलेजपासूनचे सर्व दिवस आठवले. काॅलेजमध्ये निवडणूकीच्या माध्यमातून काही वेळासाठी झालेली ओळख दहा-पंधरा वर्षानंतर नाती, भावना जपण्यापर्यंत जाईल असे वाटलेच नव्हते. खरंतर आज धकाधकीच्या आणि सोशल मिडीयाच्या युगात भावना कोरडया होत असताना अशा प्रकारची मित्रत्वाची, शुध्द मायेची झुळूक मला आयुष्यामध्ये पुढे मार्गाक्रमण करताना नक्कीच उभारी देईल. शेवटी मी इतकेच म्हणेन,
थॅंक यू अरुणा ..!
*डाॅ.संदीप डाकवे*
स्पंदन सांची परिवार





Comments
Post a Comment