माणसातला देवमाणूस म्हणजे प्रा. ए. जी.खोत
प्रा. ए.जी.खोत सर आपल्या प्रदीर्घ सेवेतून आज सोमवार, दिनांक 31 जुलै, 2023 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. प्रा. ए.जी. खोत साधारणपणे चार वर्षांपूर्वी शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथे बदलीने हजर झाले. आपण नेहमी बोलतो की सुरुवातीला माणूस जसा वाटतो तसा तो मुळातच नसतो. सरांचे गाव कोल्हापूर जिल्ह्यातील आणि यापूर्वी त्यांच्याबरोबर नोकरी करण्याची संधी कधीही मला मिळाली नव्हती तरीपण त्यांच्याबद्दल लिहावे असे मला मनापासून वाटत होते. त्यांना मी मागील महिन्यातच बोललो होतो की सर मी तुमच्याबद्दल तुमच्या सेवानिवृत्तीच्या दिवशी काहीतरी लिहिणार आहे. मला आजही आठवते ज्यावेळी खोत सर कराडमध्ये हजर झाले त्याच दिवशी मी माझी विद्यार्थिनी आणि सध्या समाजशास्त्र विभागात कार्यरत असणारी प्रा. दिपाली वाघमारे यांना मी प्रश्न विचारला की, "दिपाली खोत सर कसे आहेत?" त्यांनी त्यावेळी उत्तर दिले की, "यादव सर, आता माझे खूप अवघड आहे. नवीन आलेले सर अजिबात बोलत नाहीत तसेच ते खूप खूप शांत वाटतात. आता माझे काय खरे नाही". मी दि...