पहिला विमान प्रवास
मनुष्य जन्माला आला की त्याचा सटवाई ने लिललेला प्रवास सुरू होतो. पाचवी व बाराव्या दिवशी बारसं झालं की "लहान पण देगा देवा मुंगी साखरेचा रवा" या म्हणी प्रमाणे चार साडेचार वर्षे झाली की शाळेचा "श्री गणेशा" असा आपला जीवन प्रवास सुरू होतो. शाळा, काॅलेज, डिग्री पदवी, डिप्लोमा कोर्स पूर्ण केला की नोकरी, मग ती सरकारी असो, खाजगी किंवा शेती व्यवसाय किंवा एखाद्या कंपनी मध्ये माणूस स्थिरस्थावर झाल्यावर दोना चे चार हात केले की माणूस आपल्या आयुष्यात सेटल होतो. प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष हा ठरलेला असतो. आपल्या प्रारब्धानुसार आपला जीवन प्रवास सुरू असतो.
आयुष्याची तिस वर्षे महानगरी मुंबई येथे व्यतीत केली आहेत. या नगरीची सर्वांना भुरळ पडते. रंका पासून रावापर्यंत इथे सर्व गुण्यागोविंदाने नांदतात. हाताला काम मिळाले की जो तो या नगरीचा भार होऊन जातो. ही नगरी त्याला सोडवत नाही. जो इथं पोट भरू शकत नाही तो इतर ठिकाणी ही पोट भरू शकत नाही असा माझा कयास आहे.
१९९४ सारी मुंबई नगरीत आलो. गिरणगाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या काळाचौकी, लालबाग, परळ या विभागात बैठकीच्या गाळयावरती राहीलो. हाताला काम माळालं. थोडाफार स्थिरस्थावर झालो. नंतर सन १९९९ ला बैठकीचा गाळा विकला गेल्यावर मुंबई उपनगरात कुर्ला कमानी येथे २००० साली खोली घेतली. आमच्या घरांवरून विमाने सहरा,व छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर लॅडिंग, व उड्डाण करून बाहेरगावी जात येत असतात. या मायानगरीत रेल्वे व बेस्टचा प्रवास खुप केला. आमच्या घरावरून विमाने जात येत असल्याने पाहुणे मंडळी आले की त्यांची झोपमोड होई. परंतु आम्हाला या गोष्टीची सवय झाली आहे.
मिनिटाला येणाऱ्या विमानाच्या आवाजामुळे आपणही कधीतरी विमान प्रवास करावा असं मनात यायचं. मात्र तुटपुंजी मिळकत इथला संसार, गावचे घर, मोठा परीवार यामुळे आपलं विमान प्रवास हे स्वप्न पूर्ण होणार की नाही ही शंका होती.
एक वेळ कंपनी कामानिमित्ताने अहमदाबाद येथे ३ टायर एसी रेल्वे प्रवास केला होता. तिथे दहा बारा दिवस राहिल्या नंतर कंपनीने अहमदाबाद मुंबई माझे विमान प्रवासाचे तिकीट काढले होते. परंतु त्याच दिवशी दुसरा व्यापार ३०० टनाचा सौदा झाला. माझे तिकिट कॅन्सल करुन मला अजून चार पाच दिवस राहून सौदा पुर्ण करून रेल्वेने या असा संदेश आला. विमानातून प्रवास करायला मिळणार या आनंदावर विरजण पडले.
वेळ आणि योग आल्या शिवाय काही घडत नाही. आमचे परममित्र श्री महेश दारवटकर व श्री महादेव रघुनाथ भोसले यांनी एक दिवस आपण तिरुपती बालाजी Trip Organise करत असून जाताना विमान प्रवास करावयाचा आहे असे सांगितले. मी तात्काळ अनुमती दिली. कारण या वर्षी आमच्या उभयतांच्या लग्नाला ११ मार्च रोजी २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. माझ्या सुख दुःखात ती भक्कमपणे उभी राहिली. तिची साथ मोलाची होती. तिला सरप्राइज द्यायचं होतं. म्हणून मी आमच्या दोन व मुलांच्या दोन अशा चार तिकीट बुक करा म्हणून सांगितले. झालं, चारच दिवसांत तिकिट कन्फर्म झाली. दोनही मुलांना विंडो सिट कन्फर्म झाली होती. मुलांचं विमानातून प्रवास करण्याचं स्वप्न सत्यात उतरनार असल्यामुळे दोघेही भलतेच खुष होते. घरावरून जाणारी विमाने पाहून, "पप्पा, आपण कधी बसायचं विमानात?" हा प्रश्न विचारायचे. असंच एकदा त्यांना आपण विमानाने भारतात कुठे तरी जाऊं हे मी आश्वासन दिले होते.
तो सुदिन उगवला २० मे रोजी लोकसभेचे मतदान असल्याने माझी पत्नी सकाळी ७:३० वाजता मतदान करुन आली. आमची साडे बाराची (फ्लाईट ) विमान होते. नाष्टा चहा घेतला. बॅगा दोन दिवसांपूर्वीच भरल्या होत्या. कारण आमचे कॅप्टन महेश दारवटकर यांनी "तिरुपती बालाजी यात्रा ग्रुप " हा WhatsApp Group बनवला होता. त्या ग्रुपवर मिळालेल्या सूचनांचे आम्ही पालन करत होतो. त्यांनी दोन तिन वेळा विमान प्रवास केला असल्याने आम्ही बिनधास्त होतो.Trip चार दिवस जवळ येऊ लागला तसा ग्रुप खुप अँक्टिव्ह झाला होता.
आज आयुष्यातला पहिला विमान प्रवास छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई ते चेन्नई करणार असल्यामुळे सर्व ग्रुप खुष होता. आम्ही रहातो तेथूनच
पंधरा मिनिटांच्या अंतरावर हे विमान तळ आहे. चहा नाष्टा करून रिक्षाने विमानतळावर आलो. चेक इन चे सर्व सोपस्कार उरकल्यावर विमानतळावर आमच्या सोसायटीत रहात असलेला राहुल मस्के नावाचा मुलगा भेटला. तो BVG Group तर्फे विमानतळावरच कामाला आहे. त्याने विमानतळची संपूर्ण माहिती दिली. माझे परम मित्र महादेव रघुनाथ भोसले याची टोयोटा गाडी होती. त्याचा टूरिस्ट चा व्यवसाय असल्यामुळे त्यालाही या विमानतळाची संपूर्ण माहिती असल्यामुळे काही अडचण आली नाही. सर्व सोपस्कार उरकल्यानंतर इंडिगो कंपनीच्या महाकाय विमानात प्रवेश केला. "मन उधाण वाऱ्याचे.. गूज अंतरीचे.. आकाशी झेप घेण्याचे" मुलं खुप आनंदी स्वच्छंदी दिसत होती. कारण सुरू होणार होता आकाशाशी हितगुज करणारा सुखद प्रवास. Air Hostess (हवाई सुंदरी) यांनी कमरेचा सिट बेल्ट बांधन्याचे प्रात्यक्षिक दाखवले होते त्याप्रमाणे सर्व (Pilgrims) यात्रेकरूनी सिट बेल्ट लावले. सेफ्टी जॅकेट सिट खाली आहे. A/C, Oxygen Mask, Emergency Exit Window ईत्यादी सुचना झाल्या. धावपट्टी वरुन विमान वेगाने वर-वर आणखी वर जात होते. बरोब्बर साडे बारा वाजता आमच्या विमानाने उड्डाण केले. मुंबई ते चेन्नई पावने दोन तासांचा हवाई प्रवास सुरू झाला. जमिनीपासून वर जावू तशी मुलं आनंदाने चेकाळत होती. आमच्या दोन्ही मुलांना विंडो सिट आली होती हा दुग्ध शर्करा योग होता. मुलं अगदी हरखून गेली होती. काय बघू न काय नको अशी त्यांची अवस्था झाली होती. थोड्याच वेळात विमान कापसासारख्या दिसणाऱ्या ढगांमधून लपंडाव खेळायला लागलं. एक एक ढग पिंजून विमान मार्गक्रमण करीत पुढे जात होते. यापूर्वी फक्त घरावरून जाणारं विमान पाहत आलो होतो. Mobile Games व T.V.मध्ये बघत आलेल्या विमानामध्ये स्वतः हा विराजमान झालो आहे यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. जमीन दूर- दूर होत होती. ढग विमानाजवळ येत होते त्याला कवेत घेत होते. ढगांच्याही वर आमचे विमान गेले. असं वाटतं होतं की अंथरूण ठेवलेल्या गालीच्या मधून मार्गक्रमण करत आहेत. खाली दुरवर विटेच्या आकारांची घरे दिसत होती. पत्याच्या पानांच्या बिल्डिंग प्रमाणे ईमारती भासत होत्या. गाव -खेडी इमारती, रस्ते, बागा, तलाव नकाशात जसे दिसतात तसे सेम टु सेम दिसत होतं. डोंगर-दऱ्या, नद्या, खाली दुरवर फेसाळणारा समुद्र हे पृथ्वीवरील विहंगम दृश्य एखाद्या पेंटरने पेंटिंग्ज काढल्या प्रमाणे भासत होते. लहान मुले हे सर्व निरखून निरखून पहात होती.आपल्या ईवल्याशा नयनपटलात साठवत होती. कोणी फोटो काढत होते.कोणाला सेफ्टी सिट बेल्ट लावला आहे याचंही भान उरलं नाही.जो तो विमान प्रवासाचा मन मुराद आनंद लुटत होता.
चेन्नई जवळ येऊ लागले तसे हवाई सुंदरीने पंधरा वीस मिनिटात चेन्नई विमानतळावर पोहोचत असल्याची सुचना केली. विमान ढगांची कक्षा सोडून खाली - खाली उतरत होते. गाव - खेडी, रस्ते, इमारती हळूहळू मोठी होत गेली. चेन्नई शहर वरून स्पष्ट दिसू लागले आणि आमचे विमान काही मिनिटांतच धावपट्टीवर उतरले. कोणाचे कान दुखत होते. कुणाला गरगरत होतं. विमान उतरल्यावर मोठे पंखे थोडे उघडले गेले त्यातून सफेद धूर बाहेर पडत होता. सिट वरील एसी किट मधून सफेद धूर येत होता. २५० लोकं सुखरूप आपल्या इच्छित स्थळी पोहोचलो होतो. सदगुरू कृपेनं हा प्रवास यात्रा घडून आली होती. "जेथे जातो,तेथे माझा तु सांगाती, चालवीशी हाती धरूनिया..!!"
सदर पिकनिक यशस्वी करण्यासाठी आमचे कॅप्टन श्री महेश दारवटकर सहयोगी सदस्य महादेव रघुनाथ भोसले यांनी मोलाचे योगदान दिले. या पिकनिक मध्ये पाच कुटुंबातील लहान मोठे एकूण एकोणतीस सदस्य सहभागी झाले होते. एक कुटुंब बनले म्हणून ही पिकनिक सुफल संपूर्ण सिद्धिस गेली. सर्वाचे मनापासून आभार...!!
पुन्हा तयारीला लागू या मित्रांनो...!!
उत्तरेच्या पिकनिकसाठी... अयोध्या श्री राम आए है..!! हरी ओम..!!श्री राम..!! जय जगदंब जय दुर्गे...!!
धन्यवाद..!!
शब्दांकन : श्री सुनील पवार


Comments
Post a Comment