हॅलो, मी काळगांवची शाळा बोलतेय...!

 मी काळगांवची शाळा बोलतेय...!"

                    हे ऐकून आपण दचकला असाल पण मलाही भावना आहेत. बुधवार दि.24 एप्रिल, 2024 रोजी आपल्या काळगांव विभागात झालेल्या वादळी पावसाने माझे होत्याचे नव्हते झाले. वादळामुळे माझ्या काळजात धस्स झाले. नशीब माझ्या लेकरांना सुट्टी होती. ती माझ्याजवळ असते तर काय झाले असते या विचाराने माझा जीव जीव थाऱ्यावर नाही राहिला. मला एकटेपणाची अजिबात सवय नाही. मार्च, एप्रिल, मे महिन्यात मुलांच्या परीक्षा झाल्या की त्यांची गर्दी हळूहळू कमी व्हायची. त्यावेळी मी बैचेन व्हायची. मला कायम विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात राहायाची सवय. मुलांना समजू लागल्यापासून ते काॅलेजमध्ये जाईपर्यंत ती माझ्याच सहवासात असायची. त्यांच्या अडीअडचणी, दुःखे, आनंद सर्व गोष्टी मला समजायच्या. दिवाळीच्या सुट्टीत किंवा उन्हाळयाच्या सुट्टीत विद्यार्थी येत नसायची तर मला अजिबात करमत नसे. कित्येक मुलांनी घरच्या अडचणीमुळे माझ्यापासून नाईलाजाने दुरावत नोकरी कामधंदा करण्यास सुरुवात केली. कित्येक त्यातून शिकून मोठया पदावर गेली. अनेकजण काळया मातीची सेवा करण्यात रमले. किती किती म्हणून सांगू पण इतकं असून पण पुण्या मुंबईला गेलेल्या मुलांनी मला कधी अंतर दिलं नाही. माझ्या मुलांनी मला हवे ते दिले. 

                आपल्या भावंडांच्या शिक्षणात अडचणी येवू नये यासाठी सर्व सुविधा देत राहिल्या याचा मला कयमच अभिमान वाटत आहे. मार्च, एप्रिल मध्ये परीक्षा झाल्यावर 1 मे पर्यंत सर्व मुले निकलाची वाट बघत बसायची. या दिवशी सर्वजण यायची. अनेकांच्या पोटात भितीचा गोळा यायचा. कित्येकांच्या डोळयात अगोदरच जमूना यायच्या, आलेल्या मी पाहिल्या आहेत. 1 मे ला आल्यानंतर सर्वांच्या साक्षीने ध्वजारोहण होवून मुलांना निकाल देण्यात यायचा. या सर्वांची साक्षीदार मी आहे. मे नंतर जून महिना कधी उजाडतोय याची चातका प्रमाणे मी वाट बघत बसायची. मे महिन्याचे दिवस मला वर्षानुवर्ष गेल्यासारखे वाटायचे. 15 जूनपर्यंत पुन्हा वाट पाहत बसायची. काही जण न कुरकुरता आनंदात यायची. परंतु काहींना मी आवडत नसायची. लहान बालकंची खूप मजा यायची. त्यांना घरातून माझ्याकडे आणताना प्रसाद द्यावा लागे. बिचारी चिमुरडी मुले मोठमोठ्याने रडायची त्यावेळी माझ्या हृदयात कालवाकालव व्हायची. नंतर मात्र माझी सवय लागल्यानंतर त्यांना माझ्याशिवाय करमत नसे. जून महिना सर्व मुले, पालक शिक्षक या सर्वांच्या गडबडीचा असायचा.

                शाळा सुरु होताना घंटा, तासांची घंटा, मधली सुट्टी जेवणाची सुट्टी शाळा सुटतानाची घंटा, मुलांच्या सुंदर आवाजातील प्रार्थना, राष्ट्रगीत हे ऐकून अंगावर रोमांच यायचे. हे सर्व डोळ्यासमोर जसंच्या तसं दिसत आहे. कित्येक वर्षापासून हे सर्व मी माझ्या डोळयात साठवले आहे. परंतु, यंदा मात्र याला सर्वांना वादळाची नजर लागली आणि माझं हे सुख माझ्याकडून हिरावून घेतलं. मला होत्याचं नव्हतं करुन ठेवलं आहे. माझया जवळील साहीत्य खराब झाले आहे. पुस्तके, रेकाॅर्ड पावसाने भिजले आहे. हे पाहून माझा डोळयाला डोळा लागत नाही. त्यामुळे मला आता आपल्या सर्वांच्या मदतीची गरज आहे. शाळेत असाताना आपण मला भरभरुन दिले आहे. तुमच्या सर्वांच्या आणि शिक्षक कर्मचारी यांच्यामुळे मी रुबाबदारपणे उभी होते. या सर्वांना वादळाची नजर लागली आहे.

             माझी अवस्था बघून अनेकजण गांगरले आहेत. शिक्षक माझ्यासाठी खूप धडपडत आहेत. काही विद्यार्थी मला भेटून गेले त्यांनी माझया वेदनेवर मायेची फुंकर मारली आहे. त्यामुळे थोडे हायसे वाटत आहे. मी अनेक पिढ्या घडताना पाहिल्या आहेत. अनेक उन पावसाळे अनुभवले आहेत. पण अशी परिस्थिती पहिल्यांदाच अनुभवते आहे. आपल्या सर्वांच्या योगदानामुळे मी परत रुबाबदारपणे उभी राहीन अशी आशा आहे. परमेश्वराने हे दिवस लवकरात लवकर घालवून माझी आणि मुलांची, शिक्षकांची, पालकांची ताटातूट लवकर थांबवावी ही प्रार्थना...! त्यासाठी मी आपणास हात जोेडून विनंती करते की मला सहकार्य करा धन्यवाद...!

                                            --------आपली आवडती शाळा

Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न